डॉ. संतोष तुपे - संजीवकांची ओळख : जिब्रेलिन्स आणि जिब्रेलिक ऍसिड

Knowledgebase
संजीवकांची ओळख : जिब्रेलिन्स आणि जिब्रेलिक ऍसिड

Crop Name : OTHER ||
Work Purpose : Other ||


संजीवकांची ओळख : जिब्रेलिन्स आणि जिब्रेलिक ऍसिड

जिब्रेलिक ऍसिड च्या शोधाची गोष्ट गमतीशीर आहे.  जपानमध्ये १९ व्या शतकात भातपिक नॉर्मलपेक्षा कित्येक इंच उंच वाढून कोलमडून जायचे व त्यात तांदूळ भरला (sterile) जायचा नाही असा बकाने नावाचा रोग पसरायला लागला होता. सवाडा (१९१२) आणि कुरोसावा (१९२६) यांनी जिबरेला फुजिकोराय नावाच्या बुरशीने सोडलेल्या विषामुळे (टॉक्सिन) हा रोग होतो हे सिद्ध केले. तेजिरो याबूटा यांनी १९३५ मध्ये या बुरशीपासून हे टॉक्सिन वेगळे केले आणि त्याला जिब्रेलिन हे नाव दिले. नंतर याच्या शुद्धीकरणातून A1, A2, A3 असे तीन जिब्रेलिन मिळाले.  दुसऱ्या महायुद्धानंतर हि बुरशी अमेरिकेत नेऊन त्यावर संशोधन सुरु झाले व जिब्रेलिन्सचा पिकाच्या वाढीसाठीचा फायदा निदर्शनास आला. १९५८ साली मॅकमिलन याने वनस्पतींत (घेवड्यामध्ये) जिब्रेलिन्स तयार होतात हे दाखवले. त्यानंतर आतापर्यंत विविध बुरशी, जिवाणू आणि वनस्पतीमधून एकूण १३६ प्रकारचे जिब्रेलिन्स वेगळे केले गेलेत. यांना GA1..GA3.. GA7...अशी नावे दिलेली आहेत.  यातील GA3 म्हणजे जिब्रेलिक ऍसिड. परंतु अजूनही रासायनिक अभिक्रिया करून जिब्रेलिक ऍसिड किंवा इतर जिब्रेलिन बनवता आलेले नाही. बाजारात उपलब्ध असलेली सर्व उत्पादने हि जिबरेला फुजिकोराय/फ्युजारियम मोनालिफॉर्मे बुरशीपासून किण्वन प्रक्रियेने तयार केलेल्या जिब्रेलिक ऍसिड पासून बनवली जातात. जिब्रेलिक ऍसिडचे वनस्पतीमधील उत्पादन थांबवणारा पॅक्लोब्युट्राझोल हा घटक कायिक वाढ, फाझील वाढ थांबवून फळ, बियां सेट होण्यासाठी वापरला जातो.

पिकामध्ये जिब्रेलिन आणि जिब्रेलिक ऍसिड वापरामुळे खालील फायदे होतात -

१.  पेशी लांब होतात, रुंदावतात, पाने रुंद होतात  

२. खोड, रोपाची उंची वाढते, पिकाच्या शेंड्याची वाढ होत राहते.  

३. रोसेट गटातील वनस्पतीमध्ये फुलं येण्याआधी वापराने अंकुर फुटतो व इंटरनोडची वाढ होते.

४. बीजामध्ये अमायलेज विकाराचे प्रमाण वाढते आणि बीज अंकुरण होण्यास मदत होते.

५. द्राक्ष, ऊस, फळे व अनेक पिकाच्या उत्पादनात भरपूर वाढ होते.  

 अती तिथे माती या म्हणीप्रमाणे याचा वापर जास्त प्रमाणात केल्यास दुष्परिणाम हि दिसू शकतात. त्यामुळे लेबलवरील दिलेल्या प्रमाणात वापरावे.


फोटोतील  दुसऱ्या कुंडीमधील रोपातील जिब्रेलिक ऍसिड तयार होण्यासाठी लागणारे जनुक काढून टाकलेले आहे. त्यामुळे त्या रोपाची वाढ पूर्णपणे खुंटली. यावरून वाढीसाठीचे जिब्रेलिन्सचे महत्व कळते. अझोटोबॅक्टर, सुडोमोनास, बॅसिलस, बर्कहॉल्डेरिया हे जिवाणूही जिब्रेलिन्स सोडतात आणि पिकाच्या वाढीस मदत करतात.  







मागील लेख 

  1.  डॉ. संतोष तुपे - संजीवकांची ओळख : जिब्रेलिन्स आणि जिब्रेलिक ऍसिड
  2. डॉ. संतोष तुपे - संजीवकांची ओळख : ट्रायकॉनटेनॉल
  3. डॉ. संतोष तुपे - संजीवकांची ओळख

***************

डॉ. संतोष तुपे

ग्रीनव्हेंशन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड

Source - https://www.facebook.com/photo/?fbid=7070392362993307&set=a.1088832387816031

***************